Saturday, April 18, 2020

अनंत जगन्नाथ फाटक..


ही व्यक्तीरेखा म्हणजे खरे तर माझे लांबचे नातेवाईक, त्यांचा थोरल्या बंधूचे कुरुंदवाडात औषधाचे दुकान आहे, तेथे मी ४ वर्षे काम करत असे... त्या दरम्यान मला जे उमगले ते काका मांडण्याचा एक छोटा प्रयत्न... 

अनंत जगन्नाथ फाटक... बाळू काका 

खरे तर नावाप्रमाणेच या माणसाचा अंत लागणे कठीण होते. ते गेल्यापासून कित्येक दिवस लिहावे असे सतत वाटत होते..  शब्द जुळत होते पण उमटत नव्हते. मध्यंतरी फेसबुकवर सुंदरसा तुकडा वाचनात आला, 'याकुबभाई आणि राजा परांजपे'... याकुबभाईचे मराठी चित्रपटावरील प्रेम वाचले आणि न कळत बाळूकाकांची (सारा कुरुंदवाड त्यांना बाळू काका म्हणत असे आणि आम्ही दुकानात मालक म्हणून) आठवण आली. चित्रपटसृष्टीवर असे भरभरून प्रेम करणारे माणसे पहिले की हमखास बाळू काका समोर उभे राहतात.. 

लौकिक अर्थाने म्हणजेच अगदी ढिम्म अशा प्रचलित विचार करणाऱ्या समाजाच्या दृष्टीने पहिले तर बाळू काका म्हणजे एकदम वाया गेलेले व्यक्तिमत्व होते... पण तसे ते नव्हते ...
असतील काही गोष्टी गैर .. 
पण म्हणून संपूर्ण माणूस वाईट नाही होत... 
आयुष्याच्या शेवटी थोडा फार भरकटला असेल... पण मनाने अतिशय स्वच्छ होता.. 
आपण जी मनस्वी, हौशी वैगरे विशेषणे लावून ती तो स्वत: जगला होता..
मला विचारलं तर हा माणूस मनाला चटका लावून गेला आयुष्भर..  

डोक्यावर उभट अशी गांधी टोपी, अंगात बंडी (खिसे असेलेला खादीचा बनियन), त्यावर घोळदार सदरा आणि तितकीच घोळदार अशी विजार अशा एकदम साध्या पोशाखातील ही व्यक्ती खरेच एकदम वेगळेच रसायन  होते. 

संगीत, मराठी - हिंदी चित्रपट हा त्यांचा प्राण होता.. 
म्हणजे अगदी एकेका गाण्यासाठी त्यांनी किती दुकाने पालथी घालतील याची गिनती न केलेली बरी. मला आठवतय त्यांना काही जुन्या चित्रपटातील गाणी हवी असायची..दुकानाच्या कामासाठी मी मुंबईला आलो की एक यादी औषध दुकानाची आणि दुसरी यादी बाळू काकांची... 

टकसाल, ढोलक, यास्मिन काय काय नावे असायची.. मी आपला फिरतोय शोधत... काही मिळाली काही  नाही.. 
पुण्यात गेले तरी  दोन याद्या ठरलेल्या..  तेथे मात्र बाजीराव रोडवर एक जुना तबकडीवाला सापडला. त्यांच्याकडे प्रत्येक गाण्याला २५ रुपये प्रमाणे दोन कॅसेट भरून गाणी घेतली..

एक किस्सा कायम लोक ऐकवायचे .. बाळू काका कॉलेजला असताना एकदा राजाभाऊ फाटक (वडील-  डॉ. हेडगेवारांचा फोटो आणा नजरेसमोर) सांगलीला त्यांना भेटायला गेले... काकांची परीक्षा होती आणि ते चित्रपट पाहायला गेलेले..
शिक्षण तेथेच थांबले असावे बहुतेक.. अर्थातच लौकिकदृष्ट्या 
पण औषध दुकानात अशी कितीतरी गिर्हाईक यायची की त्यांना बाळू काकांच्या हातूनच औषध पाहिजे असे... बाळू काका अगदी घरच्या माणसाला औषध द्यावे त्याप्रमाणे समजावून देणार.. एरंडेल चहामधून  कसे प्यावे याचे प्रात्यक्षिक इतके हुबेहूब असे कि समोरच्याला वाटावे हा खरेच आता एरंडेल पिणार की काय... 
तसे वैद्यकीय शिक्षण नाहीच, पण सगळ्या पंचक्रोशीला वाटायचे बाळूकाकाच्या हाताला गुण आहे. (गाव भागात औषध दुकानदार देखील लोकांना डॉक्टरासारखाच  असतो). अर्थात बाळू काका सर्वांनाच अतिशय प्रेमाने समजावून सांगत. सगळ्या गोष्टी अगदी सोदाहरण पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता.  

या सगळ्या गदारोळात चित्रपटांचा आणि संगीताचा लळा लागला तो लागलाच... त्यात ते अक्षरश: बुडून गेले होते...
एक छोटेसे उदाहरण सांगतो.
दुपारी दुकानात सगळे जेवायला जायचे मी आणि मालक उशिरा जेवणार..
एकदा असेच बसलो असता त्यांना म्हटले काही जुने चित्रपट सांगा ...
डॉक्टर देतात तसे प्रिस्किप्शन पॅड घेतले. 
बाळूकाका एक एक चित्रपट सांगायचे त्यातील कलाकार संगीतकार, गायक सगळी कुंडलीच मांडायचे..
माझी आपली खर्डेघाशी सुरु...
दोन तीन दिवसात आम्ही किमान दोन एकशे तरी चित्रपट नोंदवले असतील.. नंतर एका वहीत उतरवून ठेवली. अजून आहेत जपून... सगळे चित्रपट झाडून ६० च्या आधीचे काही मोजके ७० चे
मुळात हा माणूस त्या काळातून बाहेरच आला नाही. 
पु लंच्या भाषेत सांगायचे तर हरीतात्या जसे सदैव शिवकाळ-पेशवे यामध्येच जगले तसेच काहीसे बाळूकाका...

आकाशवाणीवर नुसते सुरवातीचे संगीत ऐकू आले की मालक त्याचा सगळा इतिहास भूगोल सांगून रिकामे...  झाडून सारे संगीतकार जणू काही यांच्या कानातच येऊन सांगत असावेत बहुतेक ... 

गाण्याच्या कॅसेटचा ढीग होता त्यांच्याकडे... अक्षरश: ढीगच..
म्हणायचे सुहास, मी मेलो कि माझ्या मयताला येतील त्या सर्वाना एक एक कॅसेट देउन टाक...
त्यावेळी मी नव्हतो आणि त्या कॅसेट पण नव्हत्या... शेवटी शेवटी ते सारेच हरवले ...

एक जुना नॅशनल कंपनीचा टेपरेकॉर्डर होता आडवा... एकदम लाडका... आणि तसाच एक ट्रान्झिस्टर .

काकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नुसते गाणे ऐकायचे नाही तर ते अनुभवायचे... त्यांचे डोळे मान एका विलक्षण अशा तालात हलत असे...
नूतनवर चित्रित केलेलं गाणे लागले की यांचे डोळे पाहण्यासारखे..
मला आठवतेय सीमा मधले "सुनो छोटीसी गुडिया कि ....."  गुरुदत्त प्यासा .... ते  सारे हावभाव उतरायचे या माणसात.. गाणे ऐकणे आणि असा तल्लीन माणूस पाहणे दोन्ही अतिशय आनंदायी होते...  बाळू काकांना जर वाद्ये वाजवता  आली असती ना तर रात्रंदिवस ते त्यातच रमले असते कदाचित..
पण ते दर्दी होते... संगीतावर मनापासून प्रेम करणारे होते.... 

कुरुंदवाडच्या थिएटरमध्ये एकदा सूरसंगम नावाचा चित्रपट लागला होता. हे गेले दुपारीच पिक्चर पाहायला. तर थिएटरमध्ये केवळ दोनच जण. असे अनेक चित्रपट त्यांनी पाहीले असतील...

मग या प्रेमापायी.. कधी या कार्यक्रमात अमक्या गायकला भेटायला जा कधी त्याला भेटायला.. हे यांचे आपले नेहमीचे उद्योग... 
मंगेशकर म्हणजे तर जीव कि प्राण.. त्यांना लतादीदींना भेटायचे होते..
पण यांना मुंबईचा फोबिया... लोकल... गर्दी ... मग कोणीतरी बरोबर हवा..मी पण तसा फकीरच होतो... एक दिवस औषध दुकानांचा संप होता... मग आम्ही अगदी आरक्षण वगैरे करून महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईला निघालो... बाकी सर्व तयारी -- म्हणजे कुरुंदवाडचे  पेढे, वांगी, कुंदा, कवठ बर्फी सगळे अगदी व्यवस्थित .. पण भेटीची वेळ ठरवायची असते हे कोणाच्या काकाला माहित.. अर्थात बाळू काकांना याचा काही फरक पडणार नव्हता.... 

धडक दुस-या दिवशी पेडर रोड प्रभूकुंज.. 
तेव्हा आजच्या सारखे सुरेक्षेचे एव्हढे स्तोम नव्हते... त्यात आम्ही अगदी साधे सदरेवाले . काका तर मोठी घोळदार विजारवाले, वर गांधी टोपी... लता मंगेश्काराना भेटायचे आहे असे खालच्या नोदणीवाल्यास सांगून वर रवानगी झाली.... दरवाज्यावर पाटणकर म्हणून पोलीस रक्षक होता, हातात स्टेनगन....  आम्हाला पाहून त्याला काय वाटले कोणास ठावूक.. पण निरोप आत गेला... काकांची आदिनाथाशी थोडी ओळख होती.. घरात उषा ताईं होत्या त्यांनी आत घेतले.... ओळख पाळख.. मग थेट स्वयंपाक घरात... चहा फराळ  झाला... सगळ्या भेटवस्तू दिल्या..  लता दीदी नव्हत्या... (म्हणजे होत्या की नाही माहीत नाही, पण आमची भेट झाली नाही.)
बाळू काकांनी उषा ताईंच्या गाण्याची कॅसेट आणली होती.. त्यातील एक  गाणे उषाताईंकडे नव्हते... इचलकरंजीच्या भेटीत त्या तसे म्हणाल्या  होत्या..  हे काकांच्या लक्षात होते.
मग घर दाखवले... देव्हारा... दीनानाथांचा तंबोरा. वगैरे... बाळू काका भरून पावले होते.. मग आशाताईकडे मोर्चा.. त्या निघतच होत्या... दरवाज्यातच भेट झाली... 
खाली आल्यावर काकांचा प्रसन्न चेहरा पाहण्यासारखा होता. रस्त्यावरुन जाताना एकदम लक्षात आले की त्यादिवशी व्हॅलेन्टाईन डे होता. पण काकांचा व्हॅलेन्टाईन प्रभू कुंजवरच झाला होता... मग आम्ही रमतगमत दादरला आलो, तेथे मामा काणेंच्या हॉटेलात जेवण. हे पण काकांच्या जुन्या आठवणीतले म्हणून खास ठरवलेले.

आज किमान 20 वर्षे झाली या घटनेला... मुंबई आल्यापासून प्रभुकुंज जवळून कैक वेळा गेलो असेन... आत्ता तर पत्रकारीतेमुळे अनेक ठिकाणी प्रवेश सुकर झाला आहे. पण आजदेखील मला कोणी सांगितले की असेच अपॉईन्टमेन्च न घेता मंगेश्काराना भेटून ये...तर मी हजार औपचारिकता पूर्ण करत बसेन.  पण केवळ बाळू काका म्हणूनच मी त्या दिवशी थेट प्रभुकुंजमध्ये गेलो.. त्यांचे जे मनस्वी प्रेम होते संगीतावर त्यानेच मला कदाचित तिकडे ओढून नेले असावे.. .. 

हवे असलेले गाणे मिळणे म्हणजे त्यांना एव्हरेस्ट सर केल्यासारखे असायचे..  मला आठवते तेव्हा एच एम व्ही - ५ कॅसेटचे सेट काढत असे.. गझलवर असाच सेट काढला होता.. १४ वर्षाच्या एका पोरसवदा गायकाने ७० मध्ये एक झकास गजल गायली होती... ती त्यात होती... यांना ती हवी होती.. बाकीच्या साऱ्या गजल हव्याच होत्या असे नाही.. मग त्या एका गजलेसाठी अख्खा  सेट घेतला .. एक कॅसेट काढून घेऊन  बाकी मला दिल्या.. 

हा माणूस प्रचंड मनस्वी होता... काय माहित याच्या डोक्यात काय चालू असायचे....  
ढोंगीपणावर, अंधश्रद्धांवर सडकून बोलायचा. 
एकटे असले की लोकांच्या ढोंगीपणावर खूप बोलायचे. जगरहाटीत त्यांना जे काही करावे लागत असे ते सारे यावेळी बाहेर यायचे.  

मी एकदा दोन पुस्तके आणली होती.. 'भारत विकणे आहे'.. (चित्रा  सुब्रम्हण्यम - भा: वी स वाळिंबे) आणि एक अस्वस्थ हिंदू मन (प्रि. ख. कुलकर्णी) .. या माणसाने मुखपृष्ठाच्या झेरॉक्स काढल्या, गावातील काही सूचना फलकावर  लावल्या आणि लोकांना सांगितले हे पुस्तक वाचा...

एकदा तर राशीभविष्याचा एक प्रसिद्ध असा लोकप्रिय कार्यक्रम होता. (हे भविष्यकार मुळचे आमच्या गावच्या जवळचे) या कार्यक्रमात बऱ्याच वेळा जाणीवपूर्वक चावट उल्लेख करतात. काकांनी  कार्यक्रम फलकाच्या खालीच.... त्यावर सणकून टीका करणारा शालजोडीतला ठेवून दिला...
मग काय व्हायची ती बोंबा बोंब झालीच.

शेवटी शेवटी काही व्यसनांनी त्यांचा ताबा घेतला .. काही आपमतलबी.. लुटारू प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांचा फायदा देखील उठवला.. 
दुकानात बसेनासे झाले.. पण डोके शांत बसत नव्हते.... मग गावभर भटकायचे... कधी इकडे काय झाले कधी तिकडे काय...  

गावात प्रवेश करणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भर खचत होता... हे कोठून कोठून माती खडी आणून तिकडे टाकत... खरे तर हे काम नगरपालिकेचे, पण ते काय डोंबल करणार..  
त्याच वेळी त्यांच्या लक्षात आले की रस्त्यावर बाजूच्या शेतांनी अतिक्रमण केले आहे... 
रस्त्याला लागूनच ही शेतं आहेत.. रहदारी वाढत आहे रस्ता कमी पडत आहे... आणि अतिक्रमित शेती आहे.. सगळी माहिती काढली.. आणि काकांनी एक जंगी योजनाच आखली...  गावजवळ काही कामानिमित जिल्हाधिकारी आले होते... 
यांनी रस्त्याकडेचे एक मोठे चिंचेचे झाड निवडले.. आणि गळफास तयार करून घेतला... जोपर्यंत रस्त्याच्या  अतिक्रमणाची मोजणी होत नाही...ती हटवण्याचे ठरत नाही तोपर्यंत खालीच उतरणार नाही.... 
झाडून सारे पोलीस अधिकारी ..जमा झाले.. बाळू काकांना आश्वासन मिळाले लेखी..

इतके वर्षे सारा गाव ही शेती आणि रस्ता पाहत होता.. . कोणाला वाटलेच  नव्हते असे काही असेल... 

गावात संस्थानिकांचे १०० वर्षे जुने असे विष्णू मंदिर आहे. सांगलीच्या गणपती मंदिरा प्रमाणाचे बांधलेले. उत्तम स्थापत्य शैली, शिखराला भरपूर कोरीव मुर्त्या, सागवानी खांब, आणि भोवताली भरपूर मोकळी जागा. पण सध्या त्याची काही फार निगा नाही. म्हणजे पूजा अर्चा होते अगदी व्यवस्थित पण जागेचा वापर काहीच नाही, झाडी माजलेली. शेवटच्या वर्षात त्यांनी येथे काही झाडे लावली, त्याला नियमित पाणी देखील घातले. अगदी आत्महत्या करण्यापूर्वी एकाला काही पैसे देऊन पुढील काही दिवस पाणी घालण्यास देखील सांगितले. त्यांचा खूप जीव होता या मंदिरावर. कोणी नवीन दिसला की त्याला ते आवर्जून सांगायचे तेथे जाण्यास.

शेवटी शेवटी या साऱ्याचे रुपांतर काहीश त्राग्यात झाले... पण त्याला जरा योग्य दिशा मिळाली असती.. कदाचित दृश्य वेगळे असते.. 

बाळू काका साऱ्या गावाला प्रिय होते आणि त्यांना सारा गाव. गावात ओळखीचा कोणीही मृत्यूमुखी झाला की  पुढील कार्याला हजर असणाऱ्या माणसात हमखास बाळू काका असणारच. कोण कोठला जातीचा धर्माचा याचा कसलाही भेद भेद न बाळगता. 
वर्षापूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळली, तेव्हा खूप सारी स्मृती चित्रे झरकन तरळून गेली. सारा गाव त्यांच्या अखेरच्या यात्रेसाठी जमा झाला. प्रत्येकाची काही ना काही आठवण होती. 

खूप काही सांगण्यासारखे होते. जे आठवले जसे जसे शब्द सुचत गेले तसे लिहले... अजूनही खूप काही बाकी आहे.